प्रथम महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांचा होणार नागरी सन्मान
सोलापूर : प्रतिनिधी
विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींना बसव ब्रिगेडतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण रविवारी (दि. २८) सकाळी १०.३० वाजता टाकळीकर मंगल कार्यालयात होणार आहे. या पुरस्कारांची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
या पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम बसव ब्रिगेड शहर जिल्हा आणि सोनाई फाउंडेशन यांच्यावतीने होणार आहे. पुरस्कार समितीच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक ॲड. सोमेश वैद्य, तर कार्याध्यक्षपदी सोनाई फाउंडेशनचे संस्थापक युवराज राठोड यांची निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, फेटा आणि मानाचा शेला असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्यावर्षी डॉ. अमरनाथ सोलापूरे (बीदर, कर्नाटक) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर मुंबई उच्च न्यायालयातील विधीज्ञ ॲड. विश्वनाथ पाटील, महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिता माळगे, अध्यात्मिक प्रबोधन करणारे रवी बिराजदार (लातूर ), उद्योजक मल्लिनाथ अक्कळवाडे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ शशिकांत पुदे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉ. प्रतिभा पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत वैशाली शहापुरे यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या लिंगायत समाजातील यशस्वी व्यक्तींना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
बसव ब्रिगेड शहर व जिल्हा शाखेतर्फे समस्त सोलापूरकरांच्यावतीने वीरशैव कक्कय्या ढोर समाजातील प्रथम महिला खासदार झाल्याबद्दल प्रणिती शिंदे यांचा नागरी सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोलापूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट, सुजाता शास्त्री, डॉ. वैजिनाथ कुंभार, शाम धुरी, विनायक साळुंखे, मकबुल मुल्ला, नीता स्वामी, संपन्न दिवाकर यांचा विशेष सत्कार याप्रसंगी होणार आहे.
या पत्रकार परिषदेस बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे, बसव ब्रिगेडचे सोलापूर शहर सहसचिव अविनाश बिराजदार, धाराशिव कार्याध्यक्ष पंडित जळकोटे, ॲड. विनयकुमार कटारे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जतीन निमगाव, प्रसिध्दी प्रमुख दत्ता केरे आदी उपस्थित होते.