man marathi news –
मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपटातील टायटल सॉन्ग आणि ‘फ्युचर बायको’ ही जबरदस्त गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘दादल्या’ हे भन्नाट गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. मंगेश कांगणे यांचे बोल असणाऱ्या या गाण्याला रोहन -रोहन यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर चंदन कांबळे यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणे गायले आहे. अंकित मोहन आणि मंदार मांडवकर यांच्यावर चित्रीत झालेले हे प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. हळदी समारंभ गाजवणाऱ्या या गाण्यातील हूक स्टेपही लवकरच ट्रेंडिंगमध्ये येईल.
या गाण्याबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” कोळी आगऱ्यांची हळद म्हणजे तुफान धमाल असते. त्यामुळे या चित्रपटातही असे उत्साहाने भरलेले एखादे गाणे असायलाच हवे, असा अट्टाहासच होता. त्यामुसार ‘दादल्या’ गाणे आम्ही घेऊन आलो आहोत. या गाण्यात काही ठराविक स्टेप्स सोडल्या तर आम्ही नृत्यासाठी प्रत्येकाला मोकळीक दिली होती. त्यामुळे हे गाणे अतिशय कमाल चित्रित झाले आहे. त्यात रोहन -रोहनच्या जबरदस्त संगीताने यात अधिकच रंगत आणली आहे आणि या सगळ्याला जोड लाभली आहे ती गाण्याचे बोल आणि गायकाची. त्यामुळे पुढे आता हळदी संभारंभात हे गाणे आवर्जून वाजणार हे नक्की!”
श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली असून चित्रपटाचे लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, मंदार मांडवकर, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.