सोलापूर प्रतिनिधी – दि. 18 ऑगस्ट रोजी सकाळी हिरज येथील शेतकरी बाळू माळी हे त्यांच्या शेतात आले असता शेजारच्या शेतातील विहिरीतुन एक जोराजोरात ओरडण्याचा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता माळी यांना विहिरीत एक काळविटाचे पाडस पडलेले दिसले.
माळी यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शेताचे मालक अप्पू पाटील यांना फोन करून सांगितले. अप्पू पाटील यांनी लगेच WCAS चे सदस्य सोमानंद डोके यांना फोन करून सांगितले. डोके यांनी सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे यांना घटनास्थळी पाठवले.
काळवीटाच्या पाडसाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी WCAS च्या सदस्यानी सोबत रेस्क्यू किट घेतले व प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिले असता विहिरीच्या कडेने खूप झाडी आणि गवत वाढले होते. प्रथमतः वाढलेली झाडे आणि गवत कोयत्याच्या साहाय्याने काढून घेतले. थोडी जागा मोकळी करून सोबत आणलेली दोरी एका झाडाच्या बुंध्याला आवळून घेतली आणि दुसरी बाजू संतोष धाकपाडे बाळू माळी यांनी घट्ट धरून ठेवली. दोरीचे पहिली बाजू धरून सुरेश क्षीरसागर आणि अमोल जाधव हे विहिरीत उतरले. विहिरीच्या कडेने कट्टा असल्यामुळे ते काळवीटाचे पाडस कट्ट्याचे भोवती फिरत होते. रात्रीच्या अंधारात त्या पाडसाला ती विहीर दिसली नाही. त्यामुळे ते पाडस त्या विहिरीमध्ये पडले असल्याचा प्राथमिक अंदाज होता.
सुरेश क्षीरसागर आणि अमोल जाधव विहिरीत असलेल्या कट्ट्यावर उतरले. एक बाजूने क्षीरसागर आणि दुसऱ्या बाजूने जाधव हळूहळू पुढे त्या पाडसाच्या जवळ जाऊ लागले. पण पाडसाला कुठे माहित होते की आम्ही त्याला वाचावायला आलोय म्हणून, त्या पाडसाने घाबरून पाण्यामध्ये उडी घेतली. या संधीचा फायदा घेऊन सुरेश क्षीरसागर यांनी देखील पाण्यामध्ये उडी घेतली. ते पाडस पाण्यामध्ये गेल्यामुळे सुरेश क्षीरसागर यांना त्या पाडसाला पकडणे सोपे झाले. पाडसाला पकडल्यावर विहिरीतच क्षीरसागर यांनी त्या पाडसाला सोबत आणलेले लिंबू पिळून पाजले आणि ते पाडस तणावात जाऊ नये म्हणून डोळ्यावरती रुमाल बांधून आपल्या कडेवर घेऊन विहिरीच्या वरती आले.
विहिरीच्या वरती आल्यानंतर ते पाडस जोरात ओरडू लागले व निसटण्याचा प्रयत्न करू लागला. WCAS चे सदस्यांनी त्या पडसाला वरती आल्यावरती अजून एक लिंबू पिळून पाजले. लिंबू पिळून पाजल्यानंतर त्या पाडसाला कुठे लागले का त्याची पाहणी केली. ते पाडस तंदुरुस्त असल्यामुळे लगेचच त्याला निसर्गात मुक्त करण्याचे ठरविले. त्या पाडसाला सोडताना ते जोरजोरात हंबरडा फोडू लागले. त्या पाडसाचा हंबरडा फोडण्याचा आवाज ऐकल्यामुळे त्या पाडसाच्या आईची ममता जागृत झाली अन् ती बाजूलाच असलेल्या ऊसाच्या शेतातून धावत बाहेर आली, आणि आपल्या पिल्लाला सोबत घेऊन गेली. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. एका वन्यजीवाच्या पिल्लाला त्याच्या आईसोबत पुनर्भेट (Reunion) करून दिल्याचा मनस्वी आनंद झाला होता.
या बचाव कार्यात सुरेश क्षीररसागर, संतोष धाकपाडे, अमोल जाधव, बाळू माळी, तम्मा पाटील, गोपाळ माळी, प्रतीक माळी, प्रज्वल माळी, प्रणव माळी, प्रवीण माळी आदीनी सहभाग नोंदविला.