प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले ऑनलाईन उद्घाटन
सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूरचे होटगी रोड विमानतळ, ज्याची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून सोलापूरकर आणि आसपासच्या जिल्हांच्या लोकांना होती, अखेर तो क्षण आज त्यांनी अनुभवला. सोलापूर विकास मंचच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश मिळाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळावरून नागरी विमानसेवा ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन आज संपन्न झाले.
सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या दरबारी विविध निवेदने सादर करून ह्या विमानसेवेची मागणी केली होती. अनेक युनिक आंदोलने, ३१ दिवसीय तीव्र लाक्षणिक चक्री उपोषण, मुक मोर्चा, रस्त्यावर उतरणे, आणि प्रसंगी पोलिसांच्या केसला सामोरे जाणे, हा मंचचा संघर्षमय प्रवास होता. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच आज हा ऐतिहासिक क्षण साकारला आहे.
नागरी विमानसेवा सुरू झाल्याने सोलापूरसह तीन जिल्ह्यांना होणार फायदा, होटगी रोड विमानतळाच्या सुरूवातीमुळे फक्त सोलापूर शहराचाच नाही, तर धाराशिव, लातूर आणि उत्तर विजापूर येथील एकूण एक कोटी लोकसंख्येला या विमानतळाचा फायदा होणार आहे. या विमानसेवेच्या माध्यमातून या भागातील लोकांना दळणवळणाच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल आणि व्यवसाय, रोजगार, तसेच पर्यटनाला चालना मिळेल. सोलापूरच्या आर्थिक विकासाला हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
केंद्रीय नागरी उडय्यन मंत्रालयाच्या उडान स्कीम अंतर्गत सोलापूर-मुंबई, सोलापूर – नवी दिल्ली, सोलापूर – हैद्राबाद, सोलापूर – तिरुपती, सोलापूर – गोवा, सोलापूर – इंदौर सोलापूर – अहमदाबाद ह्या मार्गांवर नागरी विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी आशा आहे. ज्यामुळे वेळ आणि खर्च वाचणार आहे. राज्य सरकारने देखील ‘वायबिलिटी गॅप फंडिंग’ (VGF) अंतर्गत तिकिटांच्या किमती कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत.
या विमानतळाच्या विकासामुळे सोलापूर आणि आसपासच्या भागांना नवी संधी मिळणार आहे. यामुळे फक्त दळणवळणाची सोय सुधारेल असे नाही तर व्यवसायिक आणि औद्योगिक विकासालाही गती मिळेल. हे विमानतळ सोलापूरच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या उद्घाटन पर भाषणांत श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी तिर्थक्षेत्र पर्यटण आणि सोलापूरच्या औद्योगिक विकासाचा उल्लेख केला.
सोलापूर विकास मंच सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषय केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरुन सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्णपणे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर तथा सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी दिली.
चौकट –
कोट – होटगी रोड सोलापूर विमानतळाच्या विकासामुळे सोलापूरातील जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. या विमानतळामुळे पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर यांसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या भाविकांसाठी प्रवास सोपा होईल, ज्यामुळे अध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल. यासोबतच नवीन उद्योगधंदे येतील, व्यापार वृद्धिंगत होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे सोलापूरच्या अर्थव्यवस्थेत भरभराट होईल. उत्तम हवाई सेवा मिळाल्याने सोलापूरातील उद्योगांना आपला व्याप वाढविण्याची संधी मिळेल, ज्यामुळे शहर उद्योगविकासाचे केंद्र बनेल.
⁃ विजय कुंदन जाधव,सदस्य, सोलापूर विकास मंच