काँग्रेस प्रवक्ते प्रा. कुलकर्णी यांची सरकारवर टीका
सोलापूर – शहरात मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत. सोलापूर जिल्हाभरातून या कार्यक्रमासाठी महिला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाला काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्याने जबरदस्त विरोध केला आहे. लाडकी बहीण योजनेला महिलांना आणण्यासाठी प्रशासन तहसीलदारांवर दबाव टाकत आहेत. तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. आरोग्य खात्याचे अधिकारी हे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांवर दबाव टाकत आहेत. लाभार्थी महिलांना बळजबरीने कार्यक्रमासाठी आणले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.
आठवड्याला शासन तीन हजार कोटींचं कर्ज काढत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनाला मोठे कर्ज झाले आहे. राज्य शासन आठवड्याला तीन हजार कोटींचे कर्ज काढत आहे. कर्ज काढून शासन चालवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. राज्य सरकार ऐन निवडणुकी समोर महिलांच्या खात्यात अधिकचे पैसे जमा करत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला या जनतेने जागा दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली आहे.
चौकट –
शंभर रुपयांचे बाँड बंद करुन पाचशे रुपयांचे बाँड सुरू
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यावर कर्जाचा डोंगर निर्माण झाला आहे. राज्य शासनाने शंभर रुपयांचे बाँड बंद करून पाचशे रुपयांचे बाँड विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. शंभर रुपयांच्या बाँडवर होणारे प्रशासकीय कामकाज विनाकारण पाचशे रुपयांच्या बाँडवर करावे लागत आहे. शासनाला होत असलेल्या कर्जाची परतफेड ही सर्वसामान्य नागरिकांची लूट करुन भरपाई केली जात असल्याचा, आरोप काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.