दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहून भारतीय रेल्वे चा मोठा निर्णय
सोलापूर: दिवाळीच्या सणासाठी आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. सोलापूर विभागातून दिवाळीसाठी उत्सव विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत. दौंड ते कलबुर्गी दरम्यान ही गाडी धावणार आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
दौंड- कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडी ही 28 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरदरम्यान धावणार आहे. आठवड्यातून सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार असे पाच दिवस ही विशेष गाडी असणार आहे. दौंड रेल्वे स्थानक येथून सकाळी 5 वाजता गाडी सुटेल. तर सोलापर रेल्वे स्थानकावर 8:40 वाजता येणार आहे. शिवाय 11:20 वाजता कलबुर्गी स्थानक येथे पोहोचेल. या गाडीच्या 11 फेऱ्या होणार आहेत.
कलबुर्गी-दौंड अनारक्षित विशेष गाडी 28 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत धावेल. ही विशेष गाडी आठवड्यातून पाच दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शक्रवार आणि शनिवारी कलबर्गी रेल्वे स्थानकातून सुटेल. कलबुर्गीतून संध्याकाळी 4:10 वाजता सुटलेली ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर संध्याकाळी 6:40 वाजत येणार आहे. शिवाय ही गाडी रात्री 10:20 वाजता दौंड स्थानक येथे पोहोचणार आहे. या गाडीच्या एकूण 10 फेऱ्या होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या गाडीला दौंड, भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुईवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोती, दुधनी, गाणगापूर आणि कलबुर्गी या ठिकाणी थांबे असणार आहेत. शिवाय या गाडीला एकूण 10 अनारक्षित 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन असे एकूण 12 कोच असणार आहेत. तरी प्रवाशांनी या दिवाळी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले आहे.