सोलापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्याअनुषंगाने राज्यातील विविध मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ‘ईव्हीएम’मध्ये आलेल्या आकड्यात तफावत असल्याची बाब ठिकठिकाणी उघड झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील चार मतदारसंघात देखील अशीच बाब समोर आले आहे. त्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद म्हणाले….
सोलापूर दक्षिण
या विधानसभा मतदारसंघात मतदानादिवशी दोन लाख २३ हजार ६२४ अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. मतमोजणी दिवशी एक मताची वाढ दिसून आली. केंद्राध्यक्षांनी एक इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचे मत गृहीत न धरल्यामुळे ६७६ मते असा हिशोब केंद्राध्यक्ष दैनंदिनीत नमुद केला. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएममध्ये ६७७ मते आढळून आले. मानवीय लेखनामुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालात तफावत दिसून येते.
सोलापूर शहर मध्य
या विधानसभा मतदारसंघात मतदानादिवशी दोन लाख २९१ अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. मतमोजणी दिवशी दोन लाख २८९ मतदानाची आकडेवारी दिसून आली. दोन मतांची घट आढळून आली. केंद्राध्यक्ष केंद्र क्र.197 यांनी केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनीत दोन प्रदत्त मते ईव्हीएम मतांच्या हिशोबात गृहीत धरल्याने ६६५ मते नमुद केली. मततोजणीच्या दिवशीच्या ईव्हीएममध्ये ६६३ मते आढळून आली. मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालात तफावत दिसून येते.
करमाळा
या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी दोन लाख २९ हजार ३७५ अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि, मतमोजणी दिवशी दोन लाख २९ हजार ३७७ अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये दोन मतांची वाढ केंद्राध्यक्ष केंद्र क्र.115 यांनी नमुना ‘१७-सी’मध्ये मतांचा हिशोब लिहीताना चुकीची नोंद घेतल्याने झाली आहे. मानवीय चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालात तफावत दिसून येते.
माढा –
या विधानसभा मतदारसंघात मतदानादिवशी दोन लाख ६७ हजार ६९१ अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली.
मतमोजणीच्या दिवशी दोन लाख ६७ हजार २१ अशी मतदानाची आकडेवारी दिसली. यामध्ये ६७० मतांची घट आढळून आली. ही बाब केंद्र क्र.149 केंद्राध्यक्षांनी मॉकपोलवेळी नोंदवलेली मते ‘सीआरसी’ न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे हस्तपुस्तिकामधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवाराची मतांची तफावत त्या केंद्रावर नोंदवलेल्या मतांपेक्षा अधिक असल्यामुळे या केंद्राची ६७० मते मतमोजणी दिवशी मोजली नाहीत. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालात तफावत दिसून येते.