man marathi news network,
Pune News | दिवे घाटात शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याने रस्ता ओलांडल्याची चित्रफीत व्हायरल झाली.
सासवडवरून वडकीकडे येताना घाटाच्या उताराला बिबट्या दिसला. वडकीपासून तिसऱ्या वळणावर बिबट्या अचानक डोंगरावरून उतरून रस्ता ओलांडून झाडांमध्ये जाताना वडकीतील नागरिक तसेच प्रवाशांना दिसला. बिबट्या रस्ता ओलांडताना जवळून जाणारे दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्याच वेळेस मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचे प्रवीण मोडक यांनी सांगितले.
दरम्यान, घाटात बिबट्या दिसल्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वडकीच्या ग्रामस्थांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत होते. मात्र कोणाकडे तसे छायाचित्र किंवा चित्रफीत आढळली नव्हती, मात्र ग्रामस्थ सावधगिरी बाळगून होते.