ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने पुरस्कार प्रदान सोहळ्याचा मोठा कार्यक्रम घेण्यात येतो. त्यात विविध पुरस्कारांचे वितरण होते. या वर्षीचा समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा माजी राज्यपाल राम नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे.
शांत, मितभाषी, अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न राजकारणी अशी नाईक यांची ओळख.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे नाईक हे आज वयाच्या नव्वदीतही सक्रिय आहेत.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात त्यांनी आधी रेल्वे, गृह व संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून आणि त्यानंतर पेट्रोलियम मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री पद भूषवले.
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून ते पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले.
२०१४ साली त्यांची उत्तरप्रदेश च्या ‘राज्यपाल’ पदी निवड करण्यात आली. राज्यपाल म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष गाजले.
त्यांच्या या राजकीय आणि सामाजिक कामाची दखल घेऊन २०२४ साली भारत सरकार तर्फे अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘पद्मभूषण पुरस्कार’जाहीर करण्यात आला.